
सिंहगड, दि. २४ : सिंहगड किल्ला पाहण्यासाठी आलेला सुमारे ५० वर्षीय पर्यटक रात्रभर पावसात भरकटल्यानंतर थंडीने गारठून बेशुद्ध झाल्याची घटना गुरुवारी (दि. २३) घडली. संबंधित पर्यटक परराज्यातील असावा, असा प्राथमिक अंदाज असून तो कन्नड भाषेत बोलत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सिंहगड परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. या पर्यटकाकडे रेनकोट किंवा छत्री नसल्यामुळे तो पावसात पूर्णपणे भिजला होता. रात्रभर किल्ला परिसरात भरकटल्याने आणि पावसासह वाढलेल्या थंडीमुळे तो गारठून बेशुद्ध पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती वनविभाग आणि वनसंरक्षक समिती, घेरा सिंहगड यांना मिळाली. माहिती मिळताच सिंहगडचे वनरक्षक सुरेश बर्ले, चेकपोस्ट नाक्यावरील रात्रपाळीतील सुरक्षा कर्मचारी कैलास जराडे, नितीन गोळे, विंकी दुधाणे, धनराज सांबरे, लहू पवार, उत्तम खामकर, संतोष पढेर, निलेश सांगळे, पुरातत्त्व विभागाचे हर्षद गायकवाड आणि स्थानिक ग्रामस्थ संजय गायकवाड यांनी तातडीने शोधमोहीम राबवून पर्यटकाला शोधून काढले.
बेशुद्ध अवस्थेतील पर्यटकाला कोणताही विलंब न करता स्ट्रेचरच्या मदतीने गडावरून खाली आणण्यात आले. या मदतकार्यासाठी खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध झाली. त्यानंतर वनविभाग आणि वनसंरक्षक समितीचे सुरक्षा कर्मचारी संतोष पढेर, रोहित पढेर आणि निलेश सांगळे यांनी संबंधित पर्यटकाला पुढील उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल केले.
हा पर्यटक नेमका का आणि कसा भरकटला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती डॉक्टरांच्या तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सिंहगड किल्ला परिसर अथवा किल्ल्याकडे जाणाऱ्या पायी मार्गावर एखादा पर्यटक भरकटल्याचे आढळल्यास किंवा अन्य कोणतीही अनुचित घटना घडल्यास नागरिकांनी तातडीने वनविभाग अथवा वनसंरक्षक समिती, घेरा सिंहगड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन खानापूर–सिंहगडच्या वनपरिमंडळ अधिकारी सौ. वैशाली हाडावळे यांनी केले आहे.
वनसंरक्षक समिती, घेरा सिंहगड आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे संबंधित पर्यटकाला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली. त्यांच्या तत्पर मदतकार्यामुळे एका पर्यटकाचा जीव वाचविण्यात यश आले आहे.









