दहावीतील टॉपर २१ विद्यार्थ्यांचा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सत्कार; आदर्श विद्यार्थी पुरस्काराने गौरव मोठी घडामोड! टीईटी पेपरफुटीचा कथित मुख्य सूत्रधार बिहारमध्ये जेरबंद यापूर्वी १२ आरोपी अटकेत; भिवंडी पोलिसांच्या कारवाईने तपासाला निर्णायक वळण सिंहगडावर रात्रभर भरकटलेला पर्यटक बेशुद्धावस्थेत; सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मिळाले जीवदान ‘पीएमपीएमएल’ कुणाच्या घरची संस्था नाही; जनतेच्या हितासाठी कारभार करा! महापौर मंजूषा नागपुरे यांचा प्रशासनाला इशारा; विशेष सभेत लोकप्रतिनिधींचा संताप पुण्यात भरदिवसा गोळीबाराने खळबळ; घोरपडे पेठ आणि लोहियानगरमध्ये दोन घटना, सहा राऊंड फायर सरकारविरोधात पुण्यात ‘जेन झी’चा एल्गार; भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, नीट पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहाराविरोधात हजारोंचा तिरंगा मोर्चा

सरकारविरोधात पुण्यात ‘जेन झी’चा एल्गार; भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, नीट पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवहाराविरोधात हजारोंचा तिरंगा मोर्चा

पुणे, ता. २५ : नीट-यूजी परीक्षेतील कथित पेपरफुटी, वारंवार उघडकीस येणारे परीक्षा गैरव्यवहार तसेच दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात शुक्रवारी हजारो विद्यार्थी, तरुण-तरुणी आणि विविध क्षेत्रांतील नागरिक रस्त्यावर उतरले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. मुसळधार पावसाची पर्वा न करता विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. दुपारपासूनच लाल महाल परिसरात विद्यार्थ्यांची गर्दी होऊ लागली होती. विविध महाविद्यालये, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हातात राष्ट्रध्वज आणि भारतीय संविधानाच्या प्रती घेऊन विद्यार्थी घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरले. ‘भारत माता की जय’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘पेपर लीक की ये सरकार नहीं चलेगी’, ‘नरेंद्र-धर्मेंद्र राजीनामा द्या’, ‘तानाशाही नाही चालणार’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मोर्चाची सुरुवात लाल महाल येथून झाली. फडके हौद, दारुवाला पूल, १५ ऑगस्ट चौक आणि जुनी जिल्हा परिषद मार्गे ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. मार्गावर पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सादर केले. या आंदोलनाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या हातातील सर्जनशील फलक होते. मराठी आणि हिंदी चित्रपटांतील संवाद, लोकप्रिय मिम्स, व्यंगचित्रे आणि सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या विविध संदर्भांचा वापर करून विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा, पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर उपरोधिक भाष्य केले. या अनोख्या फलकांनी अनेक पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. काही फलकांमधून परीक्षा प्रक्रियेतील अपारदर्शकता, विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि शासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शिक्षण व्यवस्थेतील अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले. विद्यार्थी सुबोध घोडके म्हणाले, “माझ्या बहिणीला पहिल्या नीट परीक्षेत चांगले गुण मिळाले होते. मात्र परीक्षा रद्द झाल्यानंतर तिच्यावर मानसिक ताण आला. पुनर्परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही. या संपूर्ण प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि मानसिक नुकसान झाले असून याची जबाबदारी कोण घेणार?” हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राहुल सावंत यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत सांगितले की, “नीट ही केवळ एका मोठ्या समस्येची ठिणगी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या घटना समोर येत आहेत. या घटनांचा सर्वाधिक फटका प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसतो. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतील विश्वासार्हता टिकवण्यासाठी जबाबदार व्यक्तींनी नैतिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे.” संशोधक विद्यार्थी निखिल मगर यांनी शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांची गरज अधोरेखित करत सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर आम्ही यापूर्वीही आवाज उठवला आहे. सरकारने तातडीने प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत, तर तरुणाईचा संघर्ष अधिक व्यापक स्वरूप धारण करेल.” विद्यार्थी ओंकार ढोबळे यांनीही शिक्षणातील असमानतेवर टीका करत, “नेत्यांची मुले परदेशात शिक्षण घेतात, मात्र सामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते, ही दुर्दैवी बाब आहे,” असे मत व्यक्त केले. भरपावसातही विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. डफलीच्या तालावर घोषणाबाजी, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण आणि विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण मोर्चात ऊर्जावान वातावरण निर्माण झाले होते. पावसामुळे अनेकांच्या हातातील फलक भिजले, तरीही विद्यार्थ्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. ‘आम्ही लाठ्या खाल्ल्या; आता हिशेब मागणार’ अशा आशयाचे संदेश देत विद्यार्थ्यांनी शासनाला इशारा दिला.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनात सहभागी होऊ नये म्हणून काही विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांच्या मते, शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि विद्यार्थी-केंद्रित करण्यासाठी तातडीने ठोस सुधारणा करणे आवश्यक आहे. नीटसह सर्व राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा निष्पक्षपणे घेण्यात याव्यात, पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कारवाई व्हावी, दोषींना शिक्षा मिळावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या भव्य तिरंगा मोर्चाने पुण्यातील विद्यार्थी चळवळीला नवे स्वरूप दिल्याचे चित्र दिसून आले. शिक्षणातील गैरव्यवहार, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या मागणीसाठी तरुणाई मोठ्या प्रमाणात संघटित होत असल्याचा संदेश या आंदोलनातून देण्यात आला.

अधिक वाचा

error: Content is protected !!